मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कामाला गती देण्यासाठी आजपासून (२७ ऑगस्ट) गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद (Heavy traffic off)राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी ही घोषणा केली. त्यानंतर या संदर्भात वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांची वारंवार चर्चा होत असते. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही दिसून येतं. दरवर्षी गणेशोत्सव आला की मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर येतो. मग आंदोलने सुरू होतात, पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. न्यायालयाने सरकारला फटकारले तर सरकार नवी मुदत देते. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचे काम मात्र जैसे थेच राहतं. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.
अजित पवार कायम उपमुख्यमंत्री व्हायला तयार, मला त्यांची दया येते; कोश्यारींचा खोचक टोला
यानंतर प्रशासन कामाला लागले असून डिसेंबर 2023 पूर्वी संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या कामाला गती देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सध्या रस्त्याच्या कामामुळे एका लेनमधून वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांमुळे या ठिकाणी सतत वाहतुक कोंडी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अवजड वाहतूकीला बंदी घातली असून वाहनचालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
त्याचबरोबर आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते. त्यांचा प्रवास सुरक्षित आणि त्रासमुक्त व्हावा यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महामार्गावरील खड्डे मुक्त करण्याचे काम जोरात सुरू आहे.
ही बंदी 16 टनांपेक्षा जास्त क्षमतेचे ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर यांना लागू होईल. हा प्रतिबंधात्मक आदेश 27 ऑगस्ट 2023 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी मुंबई गोवा महामार्गावर लागू राहील. या वेळी अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पर्यायी मार्ग कोणता…
पळस्पे फाटा येथून कोन फाटा येथून मुंबई पुणे दृतगती महामार्गाचा वापर करून, खालापूर येथून पाली वाकण मार्गे अवजड वाहतूक वळवण्यात येणार आहे.