आमदार बच्चू कडू त्यांच्या आक्रमक कामाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते लोकांमध्येही चर्चेचा विषय ठरतात. मात्र, त्यांच्या याच पद्धतीमुळे ते अनेकदा वादातही सापडले आहेत. असाच एक प्रकार अमरावतीतील जिल्ह्यात घडला आहे. अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र, तेथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमका प्रकार काय?
गणोजातील रस्त्याच्या कामावर एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतले होते. बच्चू कडू या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना या कार्यकर्त्याने हे आक्षेप बच्चू कडूंसमोरही मांडले. त्यावेळी बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, तर कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता
रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या कार्यकर्त्याने केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि तू मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं.
यावर कार्यकर्त्यानेही बच्चू कडूंना प्रत्युत्तर देत मुर्खांना तुम्ही मुर्खात काढू नका, असं म्हटलं. त्यावर संतापलेल्या बच्चू कडूंनी तक्रारदार कार्यकर्त्याला तू पहिल्यांदा ऐकून घे, असा दम दिला. अशातच गावातील एका व्यक्तीने मध्ये हस्तक्षेप करत बोलण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडूंनी त्याच्या कानशिलात लगावली. तसेच त्यालाही शांत बस असं सांगितलं.
या घटनेनंतर हा वादाचा आणि कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच कानशिलात लगावणाऱ्या बच्चू कडूंवर टीकाही होताना दिसत आहे.
MLA Bachu Kadu got angry & slapped his Party activist in front of the police pic.twitter.com/rRUFXeq2IO
— Pranjal Mishra 🇮🇳 (@Pranjal_Writes) September 28, 2022