Just another WordPress site

Anil Parab: परब आणि जाधव यांच्यावर ED द्वारा कारवाई करून शिवसेनेची आर्थिक रसद तोडण्याचा प्रयत्न आहे का?

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या वादाने आता तीव्र स्वरुप धारण केलं… शिवसेनेचे नेते एकापाठोपाठ एक अडचणीत येताना दिसताहेत. आता मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. त्यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील सात ठिकाणांवर छापे टाकले. परब यांच्याशिवाय, यशवंत जाधव यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, हे दोन्ही नेते आर्थिक रसद पुरवतात, असं वाटत असल्यानं  त्यांच्यावर  कारवाई करून शिवसेनेच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न आहे का? याच विषयी जाणून घेऊ.हायलाईट्स

१. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात ईडीची कारवाई

२. परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुण्यातील सात ठिकाणांवर छापे टाकले

३. परब यांच्याशिवाय, यशवंत जाधव यांच्यावरही अटकेची टांगती तलवार

४. अनिल परब, जाधव हे शिवसेनेची आर्थिक बाजू मजबूत करणारे नेते

अनिल परब हे उध्दव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आहेत. व्यवसायाने वकील असणारे परब हे ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. ते पक्षाची कायदेशीर बाजूदेखील सांभाळतात. एवढंच नाही, शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या राजकीय रणनितीचे शिल्पकारही परब यांनाच मानलं जातं. मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते. मुंबई उपनगरांची संघटनात्मक जबाबदारी परब यांच्यावर असल्यानं मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंना अनिल परब अत्यंत महत्त्वाचे आहेत.  त्यामुळे परब यांना अटक झाली तर मुंबई महापालिका निवडणूक पक्षाला नक्कीच जड जाईल. परब यांच्या अडचणी वाढत असतांनाच शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीही काही कमी होताना दिसत नाहीयेत. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता ईडीचा त्यांच्या  मागे  ससेमीरा लागण्याची शक्यता आहे. त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असल्याने यशवंत जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष होते. महापालिकेची तिजोरी स्थायी समितीच्या हातात असते. कोट्यवधी रूपयांची कामं स्थायी समितीच्या मंजुरीनेच होतात. स्थायी समिती अध्यक्षाला खूप अधिकार असतात. त्यामुळे यशवंत जाधव उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचे आहेत.  जाधव हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासातील आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे इन्कम टॅक्सच्या  चौकशीचा ससेमिरा लाऊन शिवसेनेला एक इशारा देण्यात आला होता. इन्कम टॅक्सने जाधव यांच्याशी संबंधित मुंबईतील ४० मालमत्तांवर जप्तीची कारवाई केलीये. या छाप्यांमध्ये जाधव यांची एक डायरी इन्कम टॅक्सच्या हाती लागली.  या डायरित कोट्यवधींच्या संशयित व्यवराहांची नोंद असल्याचं समोर आलं.  डायरित ‘मातोश्री’ ला ५० लाख रुपयांचे एक घड्याळ दिल्याची नोंद आहे. तसंच गुढीपाडव्याला २ कोटी रुपयांची एक भेट दिली असल्याचंही नमूद आहे, असं अधिकाऱ्यांनी  सांगितलं होतं. आता त्यांच्या परदेशातील कंपन्यांबाबतही कॉर्पोरेट मंत्रालय आणि ईडीने चौकशी सुरू केली.  दरम्यान,  राजकारणात विरोधकांना आर्थिक, सामाजिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची रसद मिळू न देणं यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष रणनिती आखत असतोच. त्याच धर्तीवर शिवसेनेच्या मुंबईतील बड्या नेत्यांमागे चौकशीचा फेरा लावण्यात आल्याचं बोलल्या जातं. शिवसेना राज्यभर पसरलेला पक्ष असला तरी, त्यांचा जीव मुंबई महापालिकेतच आहे. मुंबईचं राजकारण आणि पालिकेची सत्ता सेनेसाठी सर्वांत जास्त महत्त्वाची आहे. याचं प्रमुख कारण मुंबई महापालिका शिवसेनेची आर्थिक नाडी आहे.  मुंबई महापालिका सेनेला आर्थिक रसद मिळण्याचा स्त्रोत आहे. महापालिकेवरील सत्तेमुळे शिवसेनेकडे फंड पुरेसा आहे. अनिल परब, यशवंत जाधव शिवसेनेची आर्थिक बाजू मजबूत करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांना टार्गेट करून शिवसेनेची रसद तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. दुसरं म्हणजे, या कारवाया शिवसेनेचं सतत खच्चीकरण करण्यासाठी आहे. जेणेकरून महापालिकेच्या कारभारावरून सातत्याने शिवसेनेवर आरोप होत रहातील. आणि महापालिकेवर भाजपला सत्ता मिळवणं सोपं जाईल. दरम्यान,  अनिल परब, यशवंत जाधव  यांच्यामागे चौकशी लाऊन भाजपला राजकीय फायदा मिळतोय का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!