Just another WordPress site

AFSPA Act । लष्कराला विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा काय आहे? आणि का होते रद्द करण्याची मागणी?

नागालँडमध्ये शनिवारी जवानांच्या गोळीबारात खाणमजुरांसह १४ नागरिकांचा मृत्यू झाला.  त्याचे नागालँडसह अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, नागालँडमधील हिंसाचारानंतर राज्यात तणावपूर्ण शांतता आहे. १४ मजुरांना ते दहशतवादी असल्याच्या संशयावरून ठार मारल्याच्या घटनेवरून हादरलेल्या राज्य सरकारने सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा म्हणजे अफ्स्पा कायदा  रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. गेले अनेक वर्षे अफ्स्पा  कायदा मागे घ्यावा यासाठी नागरी चळवळी, स्वयंसेवी संघटना, मानवाधिकार हक्क संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. हा अफ्स्पा  कायदा काय आहे ? आणि तो रदद् करण्याची मागणी का होते? या विषयी जाणून घेऊ.


AFSPA कायदा काय आहे?

Armed Forces Special Powers Act हा कायदा ११ सप्टेंबर १९५८ रोजी  पूर्वोत्तर राज्यांतील सेनेच्या कारवाईत मदत करण्यासाठी पारित करण्यात आला होता. १९८९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले असताना १९९० साली जम्मू – काश्मीर साठी स्वतंत्र AFSPA लागू केला गेला. हा कायदा लष्कराला जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील वादग्रस्त भागात विशेषाधिकार देतो. हा कायदा अनेक कारणांनी वादग्रस्त असून या कायद्याचा लष्कराकडून दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जातोय. त्यामुळे तो हटवण्यात यावा अशी मागणीही अनेक काळापासून होतेे. भारत सरकारने २०१५ साली त्रिपुरामधून आणि २०२८ साली मेघालयमधून हा कायदा मागे घेतला.

सध्या  AFSPA कायदा कुठे लागू आहे?

अफ्स्पा हा देशातील सीमावर्ती, अशांत असलेल्या आणि अस्थिर प्रदेशात लागू केला जातो. त्यामुळे संबंधित प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या लष्करास अनेक विशेषाधिकार मिळतात. सध्या हा AFSPA कायदा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नालागँड आणि त्रिपुरा अशा सात राज्यांसाठी आणला गेला. १९९०  च्या सशस्त्र दल  विशेष अधिकार कायद्यांतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात आला होता.


AFSPA कायद्याचे स्वरूप काय आहे?

केंद्र शासन आणि संबधित राज्य शासन एखाद्या प्रदेशाला अशांत प्रदेश म्हणून घोषित करीत असेल तर तिथे AFSPA कायदा लागू होऊ शकतो. हा  कायदा लागू होताच तेथे सशस्त्र सेनेला पाठविले जाते.  या कायदयामुळे सुरक्षा रक्षकांना कोणत्याही परिसराची तपासणी करण्याचे करण्याचे अधिकार मिळतो. तसंच  वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार हा कायदा देतो. याशिवाय, जीव जाण्याइतपत गोळीबार किंवा बळाचा वापर करण्याचा अधिकार या कायद्याने लष्कराला प्राप्त होतो. महत्वाचं म्हणजे, लष्कराने केलेल्या कारवाईसाठी लष्कराला कायदेशीर संरक्षण देण्यात आले. कोणत्याही प्रकारची चौकशी, खटला किंवा कायदेशीर कारवाई केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय करता येणार नाही अशी तरतूद या कायद्यात आहे.


अशांत क्षेत्र कधी घोषित केलं जातं? 

जेव्हा कधी एखाद्या क्षेत्रातील समुदायांमध्ये मतभेद निर्माण केला जात असेल किंवा हिंसाचार वाढविला जात असेल तेव्हा तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र अथवा राज्य शासन त्या क्षेत्राला ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करते. कायद्याचे कलम ३ अंतर्गत अफ्स्पा लागू करताना राज्य शासनाचे मत विचारात घ्यावे लागते. एखादे क्षेत्र अशांत क्षेत्र म्हणून घोषित झाले तर तेथे ३ महिने स्पेशल फोर्सची नियुक्ती केली जाते. राज्यात हा लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाऐवजी राज्य शासनालाच घ्यावा लागतो. राज्यात शांती असल्याची घोषणा झाल्यानंतर कायदा हटविला जातो.


AFSPA बद्दल सरकाचे मत काय काय आहे?

AFSPA ची गरजच पडणार नाही अशी स्थिती देशात निर्माण झाली पाहिजे. मात्र, हा कायदा हटवणं म्हणजे, आपण आपल्या जवानांना सुळावर चढवण्यासारखं आहे. त्यामुळं हा कायदा असणं गरजेंचं आहे, अशी सरकारची भूमिका आहे. तर Chief of Defence Staff जनरल बिपीन रावत यांच्यानुसार,  AFSPA मुळे खासकरून लष्कराला कठीण प्रदेशांमध्ये काम करता येतं, त्यामुळे या कायद्यात बदल करणं किंवा हा कायदा रद्द करणं चुकीचं आहे. 


AFSPA विषयी विरोधी पक्षांची काय भूमिका आहे? 

या कायद्याची तुलना इंग्रजांनी बनविलेल्या ‘रौलट’ कायद्याशी केली जाते. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज शासन रौलट कायद्याच्या आड कोणालाही अटक करत होते.   AFSPA हा कायदाही असाच आहे. अनेकदा  AFSPA  कायद्याचा दुरुपयोग केला जातो. बनावटी चकमक, लैंगिक शोषण यासारख्या घटनांमध्ये  AFSPA  कायद्याचा दुरुपयोग झाल्याचेच पुढे आलंय. त्यामुळं हा कायदा मानवाधिकाराचे उल्लंघन करणारा आहे, अशी विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. या कायद्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाल्याचे मत विरोधकांनी नोंदविले.


हेही वाचा : संभाजी ब्रिगेड हे नेमके काय प्रकरण आहे? या संघटनेची स्थापना का करण्यात आली आणि ती कसं काम करते ?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!