अहमदनगर, दि. १ (प्रतिनिधी) : राज्यातील कृषी प्रयोगशिलतेला चालना मिळावी यासाठी कृषी, कृषीसंलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची काल (दि. ३१) रोजी राज्य सरकारने घोषणा केली. नगर जिल्ह्यातील प्रादेशिक साखर संचालक येथे कार्यरत असणाऱ्या क्रांती मोरे यांना या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कृषी सेवारत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या असून त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी क्रांती मोरे यांनी शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य केले. कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्या सहयोगाने राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवणे हे क्रांती यांच्या कार्याचे स्वरूप असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. पशुधन आणि शेती यांची सांगड घालून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न, शेतकरी महिलांना मत्स्य शेतीचे प्रशिक्षण, महिलांना फळ प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे या कामासोबतच लॉकडाऊन काळात भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेचा’ नवा पर्याय शेतकऱ्यायांना उपलब्ध करून दिला. त्यातून अनेक शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात नफा आणि आत्मविश्वास मिळाला. मोरे यांच्या या शेतकऱ्यांसाठी तळमळीने केलेल्या कामाची दखल घेऊनच महाराष्ट्र शासनाने त्यांची कृषी क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली. आजवर हा पुरस्कार केवळ पुरुष अधिकाऱ्यांनाच मिळाला, मात्र; यंदा हा पुरस्कार एका महिला अधिकाऱ्याला मिळाल्याने महिला अधिकाऱ्यांसाठी ही भूषावह अशीच बाब आहे. पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
“माझे नाव मोठे व्हावे हा उद्देश ठेवून कधीच काम केले नाही. शेतकऱ्यांचे हित कसे साधता येईल, हाच माझ्या कामाचा उद्देश राहिलेला आहे. यापुढेही अजून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत राहील. शेतकरी ते थेट ग्राहक ही चळवळ अजून व्यापक करणार आहे. स्वत:ला मोठे समजत नाही. पुरस्कारातूनही समाजाला जो आनंद होतोय, तोच माझा आनंद.”
– क्रांती रवींद्र चौधरी – मोरे
(प्रादेशिक साखर संचालक, अहमदनगर)