अल्बर्ट आईनस्टाईन म्हणायचे की, जर मधमाशा नष्ट झाल्यात तर आपण चार वर्षांपेक्षा अधिक काळ जगू ही शकणार नाही. यावरून आपल्या पृथ्वीवर मधमाशांचं किती महत्त्व आहे हे लक्षात येतं. आज जागतिक मधुमाशी दिन. याच निमित्तानं मधमाशांचं महत्व काय, जागतिक मधमाशी दिनाचा इतिहास काय, मधमाशांच्या अस्तित्व टिकवण्यासाठी काय केलं पाहीजे? या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
मधमाशी आणि मनु्ष्यांचा रस्ता एकमेकांपासून वेगळा आहे. मनुष्य मधमाशांच्या मार्गात येतो, मधाचे पोळे पळवितो किंवा अजाणता मधमाशांना छेडतो तेव्हा या मधमाशा आपला खरा रंग दाखवतात. त्यामुळे मधमाशी आपल्याला शत्रू वाटते. परंतु आपल्या मनुष्यांचे जग सही सलामत चालण्यात मधमाशांचा मोठा वाटा आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीमध्ये मधमाशीचे योगदान देखील मोलाचं आहे.
जागतिक मधमाशी दिनाचा इतिहास
जागतिक मधमाशी दिवस प्रकल्पाचे प्रमुख आणि प्रजासत्ताक स्लोव्हेनियाचे उपपंतप्रधान डेजान झिदान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी एक ठराव मांडला होता. त्यास मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून जाहीर झाला. तेव्हापासून मधमाश्यांसह इतरही परागसिंचक कीटकांचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जागतिक मधमाशी दिवस जगभर साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी म्हणजे २० मे १७३४ मध्ये आधुनिक मधमाश्या पाळण्याचे प्रवर्तक अँटोन जॅनाचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत हा दिन साजरा करण्यात येतो.
मधमाशा किती प्रकारच्या आहेत?
जगात मधमाशीच्या अनेक जाती आढळून येतात. एपिस ही मधमाशीची मुख्य प्रजाती आहे. या प्रजातीतील सर्व मधमाश्यांना नांगी असते आणि त्यांना दुखावल्यास त्या नांगीने डंख मारतात. त्यापैकी एपिस मेलिफेरा ही जाती यूरोप, आफ्रिका आणि अमेरिका इथं आढळते, तर अॅपिस डॉर्सॅटा म्हणजे आग्या माशी, अॅपिस सेराना इंडिका आणि अॅपिस फ्लोरिया म्हणजे लहान माशी या तीन जाती भारतात आढळतात. याशिवाय आणखी काही माशा भारतात आढळून येतात
कामकरी माशी फलित अंड्यांपासून निर्माण होतात
कामकरी माशा या माद्या असतात. मधमाश्यांच्या पोळ्यात यांची संख्या सर्वांत जास्त असते. साधरण मधमाश्यांच्या पोळ्यात ही संख्या २० हजार ते ६० हजारांच्या जवळपास असते. कामकरी माश्या आकारमानाने राणीमाशी तसेच नरमाशी यांच्यापेक्षा लहान असतात. कामकरी माश्यांचा आयुर्मान ७०–७५ दिवसांचा असतो. पहिले ३५ दिवस त्या पोळ्यात राहून कामे करतात. नंतरचे ३५ दिवस त्या पोळ्याबाहेर पडून वसाहतीबाहेरील कामे करतात. कामकरी माशीमध्ये प्रजनन संस्था विकसित झालेली नसल्यामुळे त्या वांझ असतात. त्या फलित अंड्यांपासून निर्माण होतात.
राणीमाशी माशा प्रजननक्षम असतात
राणीमाशी ही पोळ्यातील सर्वांत महत्त्वाची मधमाशी असते. या माशा प्रजननक्षम असतात. पोळ्यात एक राणीमाशी असते. मात्र नवीन पोळे तयार होण्याच्या वेळी दोन किंवा तीन राणीमाश्या असतात. राणीमाशी आकारमानाने सर्वांत मोठी असते. राणीमाशीच्या आजूबाजूला नेहमी कामकरी माश्या वावरत असतात. त्या राणीमाशीचं रक्षण करतात. राणीमाशीच्या शरीरातून स्रवणाऱ्या ऑक्सिडीसिऑनिक आम्ल या स्पर्शगंधामुळे पोळ्यातील सर्व माश्या एकत्र राहतात. राणीमाशीचा आयु:काल दोन–तीन वर्षे असतो.
नरमाशी परागकण गोळा करू शकत नाही
नरमाशी आकारमानानं कामकरी माशीपेक्षा मोठी असते. सामान्यपणे पोळ्यात ५० ते २०० नर असतात. त्यांची निर्मिती अफलित अंड्यांपासून अनिषेकजनन पद्धतीने झालेली असते. ते आळशी आणि ऐतखाऊ असल्यामुळे मकरंद आणि परागकण गोळा करू शकत नाहीत. नरमाशांचा आयुर्मान ६० दिवसांचं असतं.
मधमाशीचे अस्तित्व धोक्यात
मधमाशी या किटकाला सामाजिक किटक म्हटल्या जातं. माणसाला अन्न वनस्पतीपासून मिळत असलं तरीही मधमाशा यात महत्वाची भुमिका बजावतात. म्हणूनच आपल्या सर्वांवर मधमाशींचे मोठे उपकार आहेत. मात्र, आज मधासारखं अमृत तयार करणाऱ्या या किटकांचं अस्तित्व धोक्यात आहे. मधासाठी पोळी जाळणं, विषारी कीटक नाशके फवारणं, मोबाईल टॉवर उभारणं या कारणांमुळं एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण जगातील अन्न-पाण्याचा हिशेब ठेवणाऱ्या ‘फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गेनायझेशन’ या संस्थेच्या अंदाजानुसार, जगभरातील आहार उत्पादनात मधमाशांचा वाटा ५७७ अब्ज डॉलर म्हणजेच ४०,००० अब्ज रुपये एवढा आहे. मात्र, मधमाशांची संख्या सातत्याने घटत असल्याचं या संस्थेच्या अहवालात सांगितलं.
मधमाशा संपल्या तर काय होईल?
मधमाशा असतील तर कृषी क्षेत्रात मधमाशांमुळे २७ टक्क्यांपासून तर २२७ टक्क्यांपर्यंत उत्पादकता वाढ होऊ शकते. आणि त्या संपल्या तर उत्पादकेत घट निर्माण होऊ शकते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एक ग्रॅमपेक्षाही कमी वजन असलेली मधमाशी पृथ्वीवरील ७० पेक्षा जास्त शेतीपिकांचे परागसिंचन करते. त्यामुळे मधमाशांची संख्या घटली तर जगातील शेतीचे उत्पादनही खाली येईल.
मधमाशांच्या असंख्य प्रजाती आहेत. मात्र अनेक कारणांमुळं या प्रजाती हळूहळू नष्ट होत आहेत. त्यामुळे या मधमाशांचे संवर्धन कसे करता येईल याबाबत जरूर विचार केला पाहिजे.
मधमाशा वाचवणे कसं शक्य आहे?
मधमाशांना वाचवण्यासाठी सरकारमान्य संस्थेतून प्राथमिक शिक्षण घेणं आवश्यक आहे. शिवाय मधमाशीपालनाचे तंत्र शिकणे आवश्यक आहे. तसंच मोठ्या प्रमाणात लोकजागृती करण्याची गरज आहे. मधमाशांचा नैसर्गिक अधिवास जपण्याकरता जंगल आणि देवराया वाचवल्या पाहीजेत. राजरोसपणे होणारी वृक्षतोड थांबवली पाहीजे. मधमाशांना खाद्य आणि वास्तव्य पुरवणारी झाडे लावली पाहीजेत. याशिवाय, शहरातील पाणवठे स्वच्छ ठेवणे, मधमाशांना पोषक असलेली विषरहित शेती म्हणून सेंद्रियशेतीचा पुरस्कार करणं गरजेचं आहे.
आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याची गरज
मधुमाशांना वाचवण्यासाठी मधमाशी पालणं करणं गरजेचं आहे. देशी व विदेशी सातपुडा मधमाशांचे संगोपन लाकडी पेट्यांद्वारे केल्या जाते. त्यामुळे याचा विविध ठिकाणी उपयोग होतो. मात्र, आगे मोहळ आणि फुलोरी मधमाशा ह्या चावतात. त्यामुळे त्यांना पारंपारिक पद्धतीने हाताळून मध वेगळे केलं जाते. त्यामुळं मधमाशांसह घरट्यांचे देखील नुकसान होते. याकरता आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
मधमाशांचे फायदे काय?
१. या मधमाशांपासून मध आणि मेण मिळते. नानाविध जंगली वनस्पतींपासून मिळणारं मध गुणकारी असते.
२. मधमाशी फलधारणेसाठी अत्यंत उपयुक्त असते. ३. रोजगार निर्मितीला वाव असल्यानं हा पूरक उद्योग म्हणून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
खरंतर निसर्गातील छोट्यातील छोटा जीवही आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. तेव्हा एवढीशी ती मधमाशी, तिचे काय कौतुक असे म्हणून तिच्या नाशाकडे दुर्लक्ष होता कामा नये. ती आपली पहिली अन्नदाती आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळं मधमाशींचे अस्तित्व टिकून राहणे हे मानवाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे.