कोरोनातून बरे झाल्यानंतर आता रुग्णांना अधिकची खबरदारी बाळगणं आवश्यक झालं. कोरोनातून बरे झालेल्या निवडक रुग्णांमध्ये नव्या प्रकारचे साइड इफेक्ट जाणवत आहेत. म्युकोरोमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होताहेत. राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलंय. अशा वेळी रुग्णांनी सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणं गरजेचं आहे. कोरोनापेक्षाही महाभयंकर असलेला म्युकोरोमायकॉसिस आजार काय आहे, या बुरशीजन्य आजाराची काय लक्षणं आहेत, आणि आपण काय काळजी घेतली पाहीजे? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
रेमडेसिवीरनंतर आता म्युकोरमायकॉसिस या अत्यंत दुर्मिळ बुरशीजन्य आजारावरील इंजेक्शनसाठी नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. डोळ्यांच्या आणि कान-नाक-घशाच्या तज्ञांकडं दररोज या आजाराच्या अनेक नवीन रुग्णांची भर पडत आहे. एका महिन्यापूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मेडिकलचे उंबरे झिजवणारे नातेवाईक आता पुन्हा म्युकोरमायकॉसिसच्या इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत. परिणामी, या बुरशीजन्य आजाराच्या इंजेक्शनची मागणी गेल्या आठवड्यापासून वेगाने वाढली असून या आजाराच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांवर म्युकोरमायकॉसीस हा अत्यंत दुर्मिळ आजार झडप घालत असल्याचं निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदवलेय.
काय आहे हा बुरशीजन्य ‘म्युकोरमायकॉसिस’ संसर्ग?
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत या दुसऱ्या लाटेत म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण वाढलेयत, असा तज्ञांचा दावा आहे.
या आजाराचा मृत्यूदर हा ५४ टक्के असून, वेळेवर उपचार घेतल्यास आजारातून बाहेर पडता येते. कोरोनानंतर कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे नाकामध्ये या बुरशीची वाढ होऊ शकते. श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जिवाणू नाकामध्ये जातात. परंतु, रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदूकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्यास इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार करता येतात. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पाच ते सात दिवसांत किंवा महिन्याभरानंतरही ही लक्षणे दिसू शकतात. शिवाय, मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
म्युकोरोमायकॉसिस घातक का आहे?
या बुरशीचा संसर्गाचा वेग सर्वाधिक आणि उपचारासाठी वेळ कमी मिळत असल्यानं हा आजार घातक असून लवकर निदान झाले तर इंजेक्शनद्वारे उपचार शक्य आहेत. मात्र, जर उपचाराला उशीर झाला तर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. शिवाय, डोळ्यांपाशी संसर्ग पोचल्यास डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे, मेंदूपर्यंत संसर्ग पोचल्यास या आजारावर उपचार करणं अवघड आहे. म्हणून या महाभयंकर आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी लक्षणं दुर्लक्षित केली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्युकोरोमायकॉसिसच्या प्रत्येक लक्षणाकडं बारकाईनं पाहिलं पाहिजे.
काय आहेत म्युकोरमायकॉसिसची लक्षणे?
चेहऱ्यावर सूज येणं, गाल दुखणं, डोळे दुखणं, डोळ्यांना सूज येणं, डोकं दुखणं आणि रक्ताळ किंवा काळसर जखम होणं ही म्युकोरोमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराची लक्षणं आहेत.
या आजाराची लागणच होऊ नये यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं आवश्यक आहे. तसंच, कोणतीही लक्षणं दिसली तर तातडीनं डॉक्टरांना दाखवणंही गरजेचं आहे.
काय काळजी घ्यायची?
१. रोगप्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
२. शिवाय, या आजाराची लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच उपचार घ्यावा.
३. म्युकोरोमायकॉसिस या बुरशीच्या प्रसाराचा वेग जास्त असल्यानं उपचारासाठी टाळाटाळ न केलेलीच बरी
४. रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करा. रक्तदाब नियंत्रित करा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल असा आहार घ्या
कोणी विशेष काळजी घ्यावी?
मधुमेह, उच्च रक्तदाब, कीटोॲसिडॉसिस हा आजार आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले व्यक्तींनी या आजारासंबंधी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
कोरोना आणि म्युकोरोमायकॉसिसची या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या… आपलं आणि आपल्या माणसांचं आरोग्य जपा.